बीड - शिरूर तालुक्यातील तागडगाव येथे पालघर जिल्ह्यातील पाच वर्षांपूर्वी कामासाठी आलेल्या मजुरांना बंधक म्हणून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सर्व मजूर पालघर जिल्ह्यातील असून यांना वेठबिगारी म्हणून ठेवण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशिल कांबळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाची संपर्क केला. त्यानंतर हालचाली करुन या मोहिमेतून 10 बालके आणि 2 प्रौढ व्यक्तींची यशस्वी सुटका करण्यात आली. या प्रकरणात शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील तीन व पाथर्डी तालुक्यातील 1 अशा 4 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143(5), 127(4), 351(2), 3(5), बंदबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 कलम 16, 17, 18, बालकामगार (प्रतिबंध व विनियमन) अधिनियम 1986 कलम 14, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 कलम 75 व 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या कुटुंबीयांमध्ये 11 वर्षांची 1 मुलगी तब्बल दीड वर्षापासून एका आरोपीच्या घरी गुरे चारणे आणि घरगुती काम करत होती. दुसरी मुलगी गेल्या 3 महिन्यांपासून दुसऱ्या आरोपीकडे जबरदस्तीने काम करत होती. तिसरी मुलगी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कामासाठी घेऊन गेली होती.